ती
ती खूप वेंधळी, बडबडी, स्वप्नाळू खर सांगायचं तर irritating; पण तरी का कुणास ठाऊक वेगळा गुण आहे की, ती सर्वांना आपलंसं करते. सर्वांचा आदर करणारी, तत्वनिष्ठ पण कधी-कधी अर्धवट ज्ञानानं हसू करवून घेणारी. सर्वांपेक्षा अगदी निराळी कधी खूप एकाकी वाटणारी तर कधी मित्रमैत्रिणींच्या गर्दीत हरवणारी-सर्वांना सामावून घेणारी. उगाचंच कुणावरही हक्क गाजवत नाही; पण कधी सर्वांना गुलाम देखील बनवणारी.
प्रत्येक भेटीच्या वेळी तिची नव्याने ओळख होते. कधी आई बनून माया केली. कधी मैत्रीण बनून साथ दिली. कधी बाप बनून जबाबदारीची जाणीव करून दिली. कधी शिक्षक बनून खूप काही शिकवलं. कधी तत्त्ववेत्ता बनून उपदेश केला, तरीदेखील स्वतःपासूनचं अजाण राहिली.
होय ती, तीच...
उगीचंच अबोला धरणारी अन् काही काळाने स्वतःहून रुसवा सोडणारी ती...
थोडी अल्लड, थोडी निरागस, स्वतःमध्ये लहानपण जपणारी ती...
कधी विसरावं म्हटलं तर स्वतः आठवण करून देणारी ती...
स्वप्नात रमणारी, इतरांच्या समस्याने ग्रासलेली ती...
कधी हास्यामध्ये आसू लपवणारी ती...
सूर्योदयाची वाट न बघता अंधारामध्येही दिवा लावण्यासाठी झटणारी ती...
वेंधळी, बडबडी, स्वप्नाळू, भलतीचं स्वाभिमानी ती...
ना कुणासारखी ती, ती फक्त तिच्याचसारखी...
ती! ती...!! ती...!!!
Comments
Post a Comment