कांद्याची चटणी



काही दिवसांपूर्वी Mummy म्हटली, "काय करू खायला?" अनावधानाने मी देखील फर्माईश केली, "कांद्याची चटणी बनवं"
मम्मी,"तुझी मोठी आई काय कांद्याची चटणी बनवतं होती...! आठवत आहे का तुला?"

अरे हो! मोठी आई आणि कांद्याची चटणी समीकरण आमच्यासाठी कुतूहलाचं... कारण घरातील मोजक्या जिन्नसातून ती स्वादिष्ट चटणी साकारायची...

ती अगदी कांदेही निवडून घेत नसतं अगदी तिला तिची सामाजिक, भौतिक अन् आर्थिक परिस्थिती निवडता आली नाही त्यामुळेचं कदाचित. मग विळा पाय आणि उंच-सकल अशा irregular जमिनीच्या मध्ये पकडून कांदा विळ्याच्या धारेवर पकडून हातांना जोर देत, आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचा जोर जसा तिच्या आयुष्यावर तसा कांदा बारीक करी...
मग तिचा खोलगट तवा ती चुलीच्या धगधगत्या आगीवर ठेवी... तो जाळंही uniform नसे जणू तिला ठाऊक होत तोही तिच्या आयुष्याच्या अनिश्चितेसारखाच आहे मग ती तव्यात अंदाजानं तेलं टाकी, तिच्याकडे तेल वापरण्याचं कसब होतं गव्हाची पोळी वा पाट्यावरचा मसाला अन् तेलाचं मेळ आणि संसाराच्या गणिताचा मेळ ती अचूक साधे... बरं, त्या तापलेल्या तेलात ती असेल तर जिरं, मोहरी टाकत नाहीतर कापलेला कांदा तव्यावर चर्रचर्र करत परतवी. कांद्याचा पाणी गुणधर्म तिच्या जीवनाकडील अपेक्षेप्रमाणं संपेपर्यंत अन् तो लालसर होईपर्यंत परतवत राही... मग पाट्यावर वाटलेली वा ठेचलेली सुकलेली मिरची लाल-तिखट म्हणून वापरी... आणि मीठ टाकी... थोडासा ठसका आणि त्या चटणीचा सुवास घरभर पसरे... कितीही खाऊन झालं तरी पोटात जागा होई... मग कधी मम्मी(तिची जाऊ), आई(तिची सासू) वा आम्ही(तिचे पुतणे-पुतणी) यांना अगदी स्वतःच्या ताटात घेऊन कांद्याची लालसर-काळसर चटणी घेई... वा...! काय स्वाद...!

अगदी काही वर्षांपूर्वी पर्यंत सगळ्या अनिश्चिततेसोबत युती करून ती कांद्याची चटणी करी. पण आयुष्य जेव्हा निश्चितता घेऊन आलं तेंव्हा तिला आजाराच्या छळछावणीनं गाठलं... तेव्हापासून त्या दिवसापर्यंत कांद्याची चटणी नव्हती खाल्ली... त्या दिवशी मोठी आई, तिचं जीवन, कष्ट, प्रेमळ स्वभाव, कधी तिरकस पण आपुलंकीच बोलणं, काळजी, जीवनाचा संघर्ष सगळं तिच्या नव्हे पण मम्मीच्या हातच्या कांद्याच्या चटणीत अनुभवलं...


:रोहित शिंदे

Comments

Popular posts from this blog

आजी

मामा होताना

ती