मामा होताना
जीवनात काही क्षण येतात, आणि तुमच्या प्रौढ झाल्याची जाणीव करून देतात... होय असंच घडतं, ३किलो १००ग्रॅमचा चिमुकला देह एका क्षणात तरूणपणाचं अन् पुन्हा लहानपणाचं, तामसी वृत्तीचं अन् थोड्याशा संयमीपणाचं, बेजबाबदार मुलाचं अन् जबाबदार मामाचं अंतर नाहीस करू पाहतो आहे...
वाटलं नव्हतं इवलासा जीव इतक्या परिवर्तनाचं कारण ठरेल...!
लहानपणी अनुभवलेल्या गोष्टी परत अनुभवू शकतो आहे, आता पुन्हा चिमणीची चिऊताई झाली, चंद्राचा पुन्हा चांदोमामा झाला, YouTube वरील Technology, Stand-up Comedy, News updates channels च्या subscription ची जागा कधी अंगाई गीते आणि बडबडगीतांनी घेतली हे समजलंच नाही. जाणवलं लहानपणी चा ससा अजूनही कापूस पिंजून ठेवला आहे तसाच आहे, 'लकडी की काठी', 'चांदोबा भागलास का' अजूनही मनाच्या कोपऱ्यात घर करून आहे... आठवणीतल्या गोष्टी परत परत घडत आहेत, १९ फेब्रुवारी पासून मी पुन्हा लहान झालो आहे अन् त्या चिमुकल्यासोबतचं मोठा होत आहे... मी माझ्यासोबत पुन्हा जगतो आहे...
Work From Home नावाचं भूत कोरोनाने पाठीवर दिलं अन् तामसी वृत्तीच आंदण आपसूक डोक्यात शिरलं. छोट्याशा गोष्टीवर ऑफिस आणि घर Differentiate न करू शकल्याने जे काही घडतं होत त्याची परिणीती वादातचं होत होती... पण ह्या मामा बनवणाऱ्या चिमुकल्याने ह्या सगळ्या बाबीच महत्व कमी करून संयमाची परीक्षा घ्यायचं ठरवलं. तू राजा का असेना माझ्यासमोर तुझं काही चालणार नाही ह्याची प्रत्येक क्षणी आठवण देतंय हे कार्ट. मग मंगेश पाडगावकर यांची कविता आठवते 'जरी तुझिया सामर्थ्याने ढळतील दिशाही दाही, मी फुलं तृणातील इवले उमलणार तरीही नाही'. चिमुकल्याच्या झोपेच्या वेळेपासून, रात्री-अपरात्रीच्या आलापापासून पहाटेच्या भूपाळी पर्यंत सयंमाची परीक्षाचं..! पूर्णतः स्वभाव नाही जाणार पण संयमीपणाकडे वाटचाल करू शकतो आहे, कदाचित...?
पुरुष गर्भवासाच्या कळा सोसत नाही, म्हणून तो मानसिक दृष्ट्या स्वतंत्र असल्याच्या कळा मात्र आयुष्यभर सोसत असतो काही वेळी यशस्वी होतो काही वेळी नाही. नेहमीचं लहान भावंड म्हणून मिळत आलेलं relaxation कधी बेजबाबदार माणसाकडे वाटचाल करतं. काही गोष्टी नाही म्हटलं तरी आपल्यासाठी आपोआप घडणार हे ठाऊकच असतं. पण आता आपल्यापेक्षाही लहान कोणीतरी येत प्रचंड जबाबदारीची जाणीव करू देऊ पाहत आहे. पाठांतरावर विश्वास नसलेला मी एक निष्ठाने अंगाई गीतांची पाठांतर करू लागलो आहे. आई-बाप होणं नक्कीच मोठी जबाबदारी आहे पण मामा होणं काही कमी जबाबदारीच काम नव्हे.
आता एखादं काम मी नाही केलं तर कोणी करेलचं, पण त्या इवल्याशासाठी मी का करू नये हा विचारही येऊ लागला आहे. अजूनही आळस कधीकधी यावर भारी होतो. पण तसं झालं तर guilt पिच्छा सोडत नाही काही दिवस. चिमुकल्याच्या चेहऱ्यावरचं हास्याची अनोखी जबाबदारीचं घेतली आहे. बघू काय जमतंय...?
चिमुकल्याची प्रत्येक प्रगती, त्याचा स्पर्श, उठणं-झोपणं, ओरडणं-बोचकारण, रडणं-हसणं यात माझ्यातील नवीन मी पाहतो आहे, बालपण जगतो आहे, धडपतोय, फसतोय; पण प्रयत्न करतोय. फसणार आहेच ठाऊक आहे कारण त्या इवल्याने मामाचं बनवलं आहे.
Khup Sundar 😘
ReplyDeleteAmazing.... mama hone itke sundar karun sangitlay... wah!!!
ReplyDeleteसमर्पक👌👌👌👌
ReplyDelete